www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप पीडित २३ वर्षीय मुलीचा फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर जाहीर झाला फोटो चुकीचा आहे. त्या मुलीचा फोटो म्हणून जो फोटो फेसबुकवर सर्वत्र शेअर होत आहे, तो त्या मुलीचा नसून दिल्ली गँगरेप प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या केरळमधील एका मुलीचा फोटो आहे. या मुलीच्या एका संबंधितांनी दिल्ली गँगरेप पीडितेच्या नावाखाली दाखवला गेलेला चुकीचा फोटो पाहिला. त्यांनी तिच्या वडिलांना माहिती दिली आणि प्रकरण लक्षात येताच तिच्या वडलांनी केरळ पोलिसांमध्ये सायबर क्राइमबद्दल तक्रार नोंदवली आहे.
१६ डिसेंबर रोजी दिल्लीमधील एक बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर अत्यंत क्रुररीत्या सामूहिक बलात्कार झाला होता. या विरोधात प्रखर आंदोलन उभं राहिलं. त्या पीडित मुलीला सिंगापुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊ शकलं नाही. ३० डिसेंबर रोजी पीडित तरुणीने अखेरचा श्वास घेतला.
या मुलीची ओळख जरी गुप्त ठेवण्यात आली असली, तरी तिचा हॉस्पिटलमधील फोटो मानून फेसबुकवर एका मुलीचा फोटो प्रसारित होऊ लागला. ही मुलगी दिल्लीतील त्या सामुहिक बलात्काराची बळी असल्याचंही सगळे हिरीरीने सांगून हा फोटो शेअर करू लागले. मात्र हा फोटो खरा नसून केरळ मधील एका मुलीचा आहे. हा फोटो दिल्लीतल्याच एका फेसबुक अकाउंटवरून प्रकाशित झाला होता. याविरोधात पोलीस आता कारवाई करणार आहेत.