www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘ब्लॅकबेरी’ आणि ‘बीबीएम’ हे काही दिवसांपर्यंत एक ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरले होते. ऑफिसमध्ये वरच्या पोझिशनवर काम करणाऱ्या मोजक्याच लोकांना ईमेल आणि मॅसेजिंगसाठी हे फोन सोईचे ठरत होते. पण, आता मात्र ब्लॅकबेरीला उतरती कळा लागलीय, हे स्पष्ट झालंय. त्यामुळे ब्लॅकबेरी आता स्मार्टफोन बाजारातून बाहेर पडणार की काय? अशी शंकाही व्यक्त होतेय.
ब्लॅकबेरीत सर्वात मोठा शेअर असलेल्या ‘फेअर फॅक्स’नं यापुढे मात्र आपण ‘ब्लॅकबेरी’ खरीदी करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सोमवारी, फेअर फॅक्सन आपण ब्लॅकबेरीत नाही तर दुसऱ्याच एका कंपनीत एक अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय. ब्लॅकबेरीचे सीईओ थॉर्स्टन हाइंस यांनाही आता कंपनीतून बाहेर पडण्याचे वेध लागलेत. त्यामुळे जॉन सेन यांना ब्लॅकबेरीच्या चेअरमन आणि इंटरीम सीईओ या पदावर बसवण्यात आलंय. चेन हे यापूर्वी सॉफ्टवेअर डाटा कंपनी असलेल्या ‘सायबेस’चे सीईओ होते. ‘आता वेगळा निर्णय घेण्याची तयारी करायला हवी’ असं त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नुकतंच ठणकावून सांगितलंय.
ब्लॅकबेरीच्या या अंतर्गत घडामोडी बरंच काही सांगून जातात. नुकतंच ब्लॅकबेरीची ‘बीबीएम’ ही सर्व्हीस अँन्ड्रॉईड आणि आयओएसवरही उपलब्ध झालीय. त्याला कारण ठरल्यात ‘व्हॉटस अप’सारख्या काही सुविधा... ‘व्हॉटस अप’नं बीबीएमचे ग्राहक आपल्याकडे खेचून घेतल्यानंतर ‘बीबीएम’ अडचणीत आली होती. त्यानंतर ही सुविधा मोठ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यानंतर मात्र दोन कोटी यूजर्सनी त्याला डाऊनलोड केलंय. बीबीएम टेक्स्ट मॅसेजिंगचं काम करतं परंतु त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.