www.24taas.com, न्यूयॉर्क
सध्या सोशल नेटवर्किंगचं फॅड इतकं वाढलंय की आपण ‘सोशल नेटवर्किंग’ची व्याख्याच नेटिझन्सनं बदलून टाकलीय. सोशल नेटवर्किंग साईटवर नवीन मित्र-मैत्रिणी बनवायच्या असतील तरी काही साध्या सुध्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. उदा, आपली खूप खाजगी माहिती जाहीर न करणं. पण, काही वेळा या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर हिंसात्मक मार्गानंही होऊ शकतो, ही गोष्ट मात्र हे नेटीझन्स कधी कधी विसरून जातात.
न्यूयॉर्कमध्ये याच सोशल नेटवर्किंग साईटमुळे एक महिला खुनी बनली. होय, या महिलेनं ती राहत असलेल्या परिसरात तिच्या शेजाऱ्यांना फेसबुक रिक्वेस्ट पाठवली होती. सोबत एक मॅसेजही... ‘माझ्या फ्रेंड रिक्वेस्टला झिडकारलंत तर त्याचे परिणाम वाईट होतील’ असं या मॅसेजमध्ये म्हटलं होतं. शेजाऱ्यांनी तिच्या या धमकीला गंभीरतेनं न घेता फ्रेंड रिक्वेस्ट धुडकावून लावली.
त्यामुळे या महिलेचा पारा एव्हढा चढला की तीनं सरळ सरळ पाच लोकांची हत्या केली. प्रकरणाचा तपास सुरु असताना पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली. या पाचही मृतांची हत्या एकाच पद्धतीनं झाली होती आणि फेसबूकचे लोगो बनवलेले नोटही या पाच जणांच्या मृतदेहाजवळ पोलिसांच्या हाती लागल्या. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात याच महिलेनं पाचही जणांचे खून केल्याचं उघड झालं.