www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
जगप्रसिद्ध आणि सगळ्यांमध्ये ज्याचं क्रेझ आहे त्या अॅन्ड्रॉईडच्या नव्या व्हर्जनचं नाव गुगलनं `किटकॅट` ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय चॉकलेटच्या बार्सच्या डिझाइनचा अॅन्ड्रॉईड मॅसकॉटही तयार करण्यात आलाय. अॅन्ड्रॉईडचे प्रमुख सुंदर पिचई यांनी काल रात्री ट्विटरवरुन नव्या व्हर्जनची घोषणा केली.
`किटकॅट` ही अॅन्ड्रॉईडची ४.४ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही सिस्टीम बाजारात कधी येणार याबद्दल गुगलनं औपचारीक घोषणा केली नसली तरी पुढील महिन्यात लॉन्च होणारा गुगलचा `नेक्सस` फोन किटकॅटवर चालणारा असू शकतो, असा अंदाज टेक बाजारात वर्तवला जातोय. गुगलनं मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमची नावं चॉकलेटच्या नावांवर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत गुगलनं सादर केलेल्या आपल्या अॅन्ड्रॉईड व्हर्जनला वेगवेगळ्या चॉकलेटची नावं दिली आहेत.
`किटकॅट`च्या नावासाठी गुगलनं `नेसले` कंपनीशी रीतसर करार केला आहे. या करारानंतर `नेसले`नं `अॅन्ड्रॉईड किटकॅट`च्या सेलिब्रेशनसाठी खास चॉकलेट बार तयार करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार `नेसले` जगभरातील १९ देशांमध्ये ५ कोटी अॅन्ड्रॉईड स्पेशल किटकॅट चॉकलेट बार बाजारात आणणार आहे.
जगभरात एक अब्ज मोबाईलमध्ये अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरण्यात येत असल्यानं गुगलकडून हा निर्णय घेण्यात आलाय. गुगलनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही नवीन युक्ती वापरल्याचंही बोललं जातंय.
अशी आहेत अॅन्ड्रॉईड व्हर्जनची आतापर्यंतची नावं-
> १.५ – अॅन्ड्रॉईड कपकेक
> १.६ - अॅन्ड्रॉईड डोनट
> २.० - अॅन्ड्रॉईड इक्लेअर
> २.२ - अॅन्ड्रॉईड फ्लोयो
> २.३ - अॅन्ड्रॉईड जिंजरब्रेड
> ३.० - अॅन्ड्रॉईड हनीकोब्म
> ४.० - अॅन्ड्रॉईड आइस्क्रीम सँडविच
> ४.१ - अॅन्ड्रॉईड जेलीबीन ४.१
> ४.२ - अॅन्ड्रॉईड जेलीबीन ४.२
> ४.३ - अॅन्ड्रॉईड जेलीबीन ४.३
> ४.४ - अॅन्ड्रॉईड किटकॅट
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.