आयटी कंपन्यांची ‘सोशल सुपारी’!

सोशल मीडियावर काही आयटी कंपन्या राजकीय नेत्यांना प्रसिद्ध आणि बदनाम करण्याची सुपारी घेत असल्याची धक्कादायक बातमी पुढं आलीय. यासाठी ते भरभक्कम पैसेही घेत आहेत. इन्वेस्टिगेटीव्ह वेबसाईट ‘कोब्रा पोस्ट’नं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे आयटी कंपन्यांचा पर्दाफाश केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 29, 2013, 04:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोशल मीडियावर काही आयटी कंपन्या राजकीय नेत्यांना प्रसिद्ध आणि बदनाम करण्याची सुपारी घेत असल्याची धक्कादायक बातमी पुढं आलीय. यासाठी ते भरभक्कम पैसेही घेत आहेत. इन्वेस्टिगेटीव्ह वेबसाईट ‘कोब्रा पोस्ट’नं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे आयटी कंपन्यांचा पर्दाफाश केलाय.
ऑपरेशन ‘ब्लू वायरस’ असं या स्टिंग ऑपरेशनचं नाव आहे. यात जवळपास दोन डझन म्हणजे २४ आयटी कंपन्यांचा पर्दाफाश करण्यात आलाय. ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना प्रसिद्ध किंवा बदनाम करतात आणि भरपूर पैसा कमावतात.
फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून वैवाहिक संबंधांमध्ये दुरावा आणण्यापासून ते एखाद्याचं करिअर उद्धस्त करणं किंवा राजकारण्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आयटी कंपन्या काम करत आहेत. फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट भारतात लोकप्रिय ठरत असून या वेबसाईटच्या युजर्सचा संख्या पाहता अवघ्या एका पोस्टनं लाखो लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं.
या पार्श्वभूमिवर एका वेबपोर्टलनं सोशल नेटवर्किंगच्या आधारे बदनामी करणाऱ्या कंपन्यांचीच पोलखोल केली आहे. वेबपोर्टलला एका प्रतिनिधी सोशल मीडिया मॅनेज करणाऱ्या सुमारे दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये गेला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका नेत्याचा कार्यकर्ता असल्याचं सांगत संबंधित प्रतिनिधी एका कंपनीत गेला. या कंपनीनं गुन्हेगार नेत्याची प्रतिमा सुधारण्यासाठी विरोधी नेत्याची प्रतिमा खराब करु असं सांगितलं. यासाठी विरोधी नेत्याचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ तयार करण्याची तयारीही या कंपनीनं दर्शवली.
तर एका कंपनीनं फेसबुकद्वारं अफवा पसरवून विरोधी पक्षाच्या मतदारांना घाबरवू असं आश्वासन दिलं. आणखी एका अन्य कंपनीनं तर दुसऱ्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्यात गैर काहीच नाही असं सांगितलं. यावर कळस म्हणजे ज्या वेबपोर्टलनं हे स्टिंग केलं. त्या वेबपोर्टलच्या संपादकांचीच बदनामी करण्यासाठी एक कंपनी तयार होती. या कामासाठी या कंपन्यांनी वेबपोर्टलच्या प्रतिनिधीकडे लाखभर रुपयांपासून ते एक कोटी रुपये मागितले होते.
व्हायरसद्वारं लाईक्स वाढवू सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रियता वाढवण्यासाठी लाईक्सची संख्या वाढवणं गरजेचं आहे. यासाठी एका कंपनीनं व्हायरसच्या आधारे लाईक्स वाढवून देऊ असं सांगितलं. तर एका कंपनीनं लाईक्स विकत घेऊ असं आश्वासनही दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.