www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
2014 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी नानाविध शकला लढवण्यात येतायत. सध्या तरूणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुक, ट्विटर, युट्युबसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर देखील राजकीय नेत्यांनी कट्टे जमवायला सुरूवात केलीय.
लोकसभेची आगामी निवडणूक फारच रंजक ठरणार आहे. कारण भिंती रंगवणं, प्रचारपत्रकं वाटणं, होर्डिंग्ज आणि बॅनर लावणं अशा नेहमीच्या प्रचाराच्या पद्धतींसोबतच यंदा सोशल नेटवर्किंग साइटसचा वापर हा नवा फंडा असणार आहे. काँग्रेस आणि भाजपने फेसबुक, ट्विटर आणि यूट्युबवर आपापली अकाऊंट सुरू केली असून, त्या माध्यमातून तरूणाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी सुरू केलाय. एकीकडे केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या कामगिरीचे ढोल काँग्रेसकडून वाजवले जात आहेत. देशाच्या पर कॅपिटा उत्पन्नात झालेली वाढ, अन्नसुरक्षा, आर्थिक सुधारणा, आधार कार्ड योजना आदींचा डंका काँग्रेस वाजवत आहे. गांधी घराण्यावर तर खास फोकस करण्यात आलाय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकीय प्रवासावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलंय. तर दुसरीकडे भाजपने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न चालवले आहेत. मतदान ओळखपत्रासाठी कसा अर्ज करावा, वगैरे तरूण मतदारांना आवश्यक माहिती भाजपच्या वतीने देण्यात येत आहे.
फेसबुकवरील काँग्रेसच्या पेजला 1 लाख 31 हजार 690 लोकांनी लाइक केलंय, तर भाजपचे पेज लाइक करणारांची संख्या 10 लाख 98 हजार 339 इतकी आहे.
भाजपचे ट्विटर अकाऊंट अनेक दिवसांपासून सुरू आहे, तर काँग्रेसने मात्र गेल्या 3 ऑगस्ट रोजीच ट्विट करायला सुरूवात केलीय. अवघ्या दोन दिवसात काँग्रेसने 2614 फॉलोअर्स जमा केलेत, तर भाजपच्या खात्यात 97 हजार 466 फॉलोअर्स आहेत. युट्युबवर भाजपच्या सबस्क्राइबरची संख्या 14 हजार 940 आहे, तर काँग्रेसने मात्र आपल्या सबस्क्राइबरची माहिती जाहीर केलेली नाहीय.
भाजप आणि काँग्रेस यांच्यातील ही तुलना पाहिल्यानंतर सोशल नेटवर्किंगच्या मैदानात भाजप आघाडीवर असल्याचे वाटत असले तरी काँग्रेसनेही आता जोर लावायला सुरूवात केलीय. त्यामुळे हा व्हर्च्युअल आखाडा चांगलाच रंगणार, एवढं निश्चित....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.