www.24taas.com, मुंबई
फेसबुक म्हणजे आजच्या तरूणाईला `चमकण्याचं` एक हक्काचं व्यासपीठच मिळालं आहे. फेसबुकमुळे अनेक चांगल्या गोष्टींना प्राधान्य मिळतं. मात्र त्याचबरोबर आपण या माध्यमाचा कसा वापर करतोय ह्याचे भान मात्र आपण हरपतोय अशी खंत आता व्यक्त करण्यात येते आहे. १६ डिसेंबर हा भारतीय सैन्याचा `विजय दिन` म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचा विजय दिन सोहळा शिवाजी पार्कवर मोठ्या दिमाखात पार पडला खरा पण, ‘फेसबुक’वर चमकण्यासाठी तेथे तरूणांचे फोटोसेशन सुरू होते.
या विजयदिनाचे महत्त्व लक्षात न घेता... आपला `फेस` कसा चमकेल याची जो तो काळजी घेत होता. अशी खंत लष्करी अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. देशातील तरुणांनी लष्करी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरूच असतात. विजय दिन सोहळ्याच्या माध्यमातून तरुणांना स्फुरण मिळावे हा उद्देश असतो. पण शिवाजी पार्कवरील विजय दिनाच्या सांगता सोहळ्यानंतर लष्करी अधिकार्यांनी तरुणांमध्ये स्फुरण कमी आणि फोटोसेशन जास्त होते अशी खंत व्यक्त केली आहे.
तरुणांच्या अनास्थेबद्दल तक्रार तर आहेच पण लहान मुलांचे मात्र कौतुक करावे लागेल. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बच्चे कंपनीने पालकांसह सोहळ्याला गर्दी केली होती. सायंकाळी सोहळा संपल्यावरही जवानांना पाहण्यासाठी हे चिमुकले धडपडत होते.