इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात रंगत

टी-२० विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारतीय संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे. कोलोंबोमध्ये आज संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 28, 2012, 05:14 PM IST

www.24taas.com, कोलंबो
टी-२० विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारतीय संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे. कोलोंबोमध्ये आज संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
सुपर एटमध्ये भारतीय संघाच्या ग्रुपमध्ये तुल्यबल संघ असल्याने टीम इंडियाला प्रत्येक सामना जिंकणं महत्वाचे आहे. कारण भारताचा सामना आहे तो ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानशी. तेव्हा उपांत्य फेरी गाठायची असेल तर टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात विजय मिळविणे क्रमप्राप्त आहे.
टीम इंडियाने गतवेळच्या विजेत्या इंग्लंडला पराभूत केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियाला पराभूत करतील अशी अपेक्षा आहे.
कामगिरीत सातत्य राखताना विजयी सुरुवात करण्यास दोन्ही संघ उत्सुक आहेत. या लढतीत पाच गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने वर्तवली आहे. भारताला गोलंदाजीतील ‘काँबिनेशन’ची चिंता भेडसावतेय. साखळीत इंग्लंडविरुद्ध अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने यशस्वी पुनरागमन केले. त्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे.
पाच गोलंदाज खेळवल्यास सलामीवीर वीरेंदर सेहवाग किंवा अष्टपैलू युवराज सिंगपैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल. सिनियर झहीर खानला अद्याप सूर गवसलेला नाही.