मुंबई : भारताचा नवा कोच कोण होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे तर भारताचा कोच होण्यासाठी देखील अनेक दिग्गज क्रिकेटर इच्छूक आहेत. आता या यादीमध्ये आणखी एका क्रिकेटरचं नाव चर्चेत आहे.
न्यूजीलंडचा माजी कर्णधार डेनियल विटोरी टीम इंडियाच्या कोचच्या स्पर्धेत येवू शकतो. विटोरी सध्या आयपीएल ९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा चीफ कोच आहे.
२०१४ मध्ये धोनीने टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर विराट कोहलीने विटोरीचं नाव सुचवलं होतं. विटोरी आधी गेरी कस्टन, ग्रेग चॅपल, डंकन फ्लेचर हे भारतीय टीमचे कोच होते. कोहलीला हे नाव या पदासाठी योग्य वाटतंय. बीसीसीआय यावर काय विचार करतंय की नाही याबाबतची मात्र कुठलीही अधिकृत माहिती नाही.
जून २०१६ ते मार्च २०१७ या दरम्यान टीम इंडियाला १८ टेस्ट मॅच खेळायचे आहेत. त्यामुळे लवकरच नव्या कोचची घोषणा होण्याची शक्यता आहे. विटोरीने मार्च २०१५ मध्ये क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. २०१४ पासून विटोरी बंगळुरुचं कोशिंग करतोय.