'मौलाना मसूदचं शीर आणा, मग मॅच घ्या'

भारत आणि पाकिस्तानमध्ये धर्मशाळामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचबाबतची अनिश्चितता कायम आहे.

Updated: Mar 4, 2016, 07:45 PM IST
'मौलाना मसूदचं शीर आणा, मग मॅच घ्या' title=

सिमला: भारत आणि पाकिस्तानमध्ये धर्मशाळामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचबाबतची अनिश्चितता कायम आहे. धर्मशाळामध्ये होणाऱ्या या टी-20 ला आता काही माजी सैनिकांनी विरोध केला आहे. याआधी राज्य सरकारनंही या मॅचला सुरक्षा पुरवायला नकार दिला होता. 

जोपर्यंत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरचं शिर धर्मशाळेमध्ये येत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान मॅच होऊ नये, असं पत्र माजी सैनिक लीग प्रमुख मेजर विजय सिंग मनकोटिया यांनी बीसीसीआयला सांगितलं आहे. 

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिमाचल प्रदेशमधले 2 जवान शहीद झाले. त्यामुळे दहशतवाद आणि क्रिकेट एकाच वेळी होऊ शकत नाही, असं मनकोटिया म्हणाले आहेत. 

या मॅचमधून मिळणारी काही रक्कम शहीदांच्या परिवाराला दिली जाईल, असं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले होते. यावरुनही मनकोटियांनी अनुराग ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. हे वक्तव्य करणं म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचं ते म्हणाले आहेत.

भारत-पाकिस्तानमधली ही मॅच होऊ नये म्हणून माजी सैनिक 10 मार्चपासून धर्मशाळामध्ये आंदोलन करणार आहेत.