नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात क्रिकेटपटू उमेश यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.
२०१६-१७ या कालावधीत घरच्या मैदानावर उमेश १३ सामने खेळला. खरतरं भारतीय खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक नसतात मात्र त्यानंतरही त्याने अशा खेळपट्ट्यांवर चांगला खेळ केला.
काही दिवसांपूर्वी उमेशने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या यशस्वी होण्यामागचे सिक्रेट सांगितले. लग्नानंतर आपले जीवन कसे बदलले हे त्याने या मुलाखतीत सांगितले.
जेव्हा मी संघात आलो होतो तेव्हा सतत टीममधून आत बाहेर होत होतो. कधी विकेट घ्यायचो तर कधी निराशा व्हायची. मला कसोटी संघात स्थान मिळत नव्हते. अनेक सामन्यातून मला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे संघात स्थान सुरक्षित करता येत नव्हते. मात्र जेव्हा माझे लग्न झाले त्यानंतर मात्र चांगलाच बदल झाला. माझ्या कामगिरीतही सुधारणा होत गेली, असे उमेशने यावेळी सांगितले.
पत्नी तान्या माझ्या जीवनात आल्यानंतर मी खूप बदललो. मी आता फक्त स्वत:पुरता नाही तर जोडीदाराबद्दलही विचार करायला लागलोय. पत्नीचा विचार करण्यासोबतच माझ्या कामगिरीतही सुधारणा होतेय. भविष्याबाबतही अधिक जागरुक झालोय, असे पुढे उमेश म्हणाला.