भारतानं घेतला पुण्यातल्या पराभवाचा बदला

पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

Updated: Feb 12, 2016, 11:12 PM IST
भारतानं घेतला पुण्यातल्या पराभवाचा बदला title=

रांची: पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे. रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं श्रीलंकेचा तब्बल 69 रननं पराभव केला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते शिखर धवन आणि आर.अश्विन.

टॉस जिंकून श्रीलंकेनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. भारताचे ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मानं श्रीलंकेच्या बॉलरचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या विकेटसाठी 75 रनची पार्टनरशिप केली.

शिखर धवननं 25 बॉलमध्ये 51 रन तर रोहित शर्मानं 36 बॉलमध्ये 43 रन केल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या रैना आणि हार्दिक पंड्यानंही चांगली फटकेबाजी केली. रैनानं 19 बॉलमध्ये 30 तर हार्दिक पंड्यानं 12 बॉलमध्ये 27 रनची अफलातून खेळी केली. यामुळे 20 ओव्हरमध्ये भारताला 196 रनचा पल्ला गाठता आला. 

एकवेळ भारताचा स्कोर 200 पेक्षा वरती जाईल असं वाटत होतं, पण श्रीलंकेच्या थिसारा परेरानं घेतलेल्या हॅट्रिकमुळे भारताला 196 रनवरच समाधान मानावं लागलं. 

197 रनचा पाठलाग करायला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. स्कोरबोर्डवर फक्त 16 रन असतानाच श्रीलंकेचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या धक्क्यांनंतर श्रीलंका काही सावरली नाही, आणि 127 रनपर्यंतच मजल मारता आली. 

भारताकडून आर.अश्विननं सर्वाधिक 3 विकेट, तर नेहरा, जडेजा आणि बुमराहनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 25 बॉलमध्ये 51 रन करणाऱ्या शिखर धवनला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आलं आहे.