मेलबर्न : वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं.
टीम इंडियाने मेलबर्नच्या मैदानात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला तब्बल १३० धावांनी हरवलंय, यानंतर सर्वांना फटाके फोडण्याचा 'मौका' मिळाला आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या शिखर धवनचं दमदार शतक लगावलं, अजिंक्य रहाणेच्या धडाकेबाज ६० चेंडूत ७९ धावांच्या जोरावर ७ बाद ३०७ धावा झाल्या, ३०८ धावांचं टार्गेट आफ्रिकेला देण्यात आलं.
या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन टीम १७७ धावांत गारद झाली. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर आफ्रिकेकडून ड्युप्लेसिसने सर्वाधिक ५५ धावा केल्या. कर्णधार डीव्हिलियर्स ३० धावा करून धावबाद झाला.
या सामन्यात भारताचा कर्णधार धोनीनं नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय सलामीच्या शिखर धवननं योग्य ठरवला. रोहित शर्मा स्वस्तात धावचीत झाल्यावर शिखर धवननं दुसरी खिंड लावून धरली.
धवननं वैयक्तिक शतक तर झळकावलंच, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या साथीनं भारतीय डावाची बांधणीही केली. शिखर धवननं १३७ धावांची, रहाणेनं ७९ धावांची आणि विराट कोहलीनं ४६ धावांची खेळी केली.
धवननं कोहलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची, आणि रहाणेच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी रचली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.