नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपच्या घमासानला आजपासून सुरुवात होतेय. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा वर्ल्डकप सोहळा एक पर्वणीच असणार आहे.
आजपासून पात्रता फेरीतील सामन्यांना सुरुवात होतेय. पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत झिम्बाब्वे आणि हाँगकाँग हे दोन संघ आमनेसामने असतील. दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल.
त्यानंतर दुसरा सामना अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हे दोन्ही सामने रंगणार आहे.
१३ मार्चपर्यंत पात्रता फेरीतील सामने होणार आहेत. त्यानंतर १५ मार्चपासून सुपर १० मधील सामन्यांना सुरुवात होईल. यात पहिलीच लढत यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात असणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारतासमोर आव्हान असेल ते किवींना हरवण्याचे.
गेल्या काही दिवसांपासून टी-२०मध्ये भारताचा फॉर्म पाहता या वर्ल्डकपमध्ये भारताला विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जातेय. न्यूझीलंडच्या लढतीनंतर भारताची लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
२००७मध्ये भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. मात्र त्यानंतर भारताला आतापर्यंत वर्ल्डकपने हुलकावणी दिली. त्यामुळे मायभूमीत ही स्पर्धा जिंकत भारतीय क्रिकेट चाहत्यांना वर्ल्डकप गिफ्ट देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय.