बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही नमवलं

टीम इंडियाला हरवल्यानंतर बांगलादेशने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि भारतापाठोपाठ बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही वन डे मालिकेत धूळ चारण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे. 

Updated: Jul 15, 2015, 11:36 PM IST
बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही नमवलं title=

चितगाव : टीम इंडियाला हरवल्यानंतर बांगलादेशने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि भारतापाठोपाठ बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही वन डे मालिकेत धूळ चारण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे. 

कारण चितगावच्या तिसऱ्या वन डेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचं पानीपत केलं आहे. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवून तीन वन डे सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

सौम्या सरकारला सामनावीराच्या आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. दरम्यान बांगलादेशचा मायदेशातील हा सलग चौथा विजय आहे.
 
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ४०-४० षटकांचा खेळवण्यात आला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ४० षटकांत नऊ बाद १६८ असं रोखलं.
 
विजयासाठीच्या १६९ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकारने अर्धशतक झळकावली. तमिम इक्बालने ७७ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह नाबाद ६१ धावांची खेळी रचली. 

सौम्या सरकारने ७५ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ९० धावांची जबरदस्त खेळी केली. त्यामुळे बांगलादेशला १६९ धावांचं लक्ष्य २६.१ षटकांत केवळ एका विकेटच्या मोबदल्यात गाठता आलं.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.