www.24taas.com, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभेचा खासदार म्हणून देशातील क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी ‘मास्टर प्लान’ तयार केलाय. हा मास्टर प्लान मागच्या महिन्यात मनुष्य विकासबळ मंत्री कपिल सिब्बल आणि क्रीडा मंत्री अजय माकन यांना सोपवण्यात आलाय. देशात क्रीडा संस्कृती जोपासली जावी आणि क्रीडा संस्कृतीची निकोप वाढ व्हावी यासाठी सचिननं क्रीडा आणि मनुष्य विकासबल मंत्रालयाला काही उपाय सुचवलेत.
शालेय अभ्यासक्रमात खेळ सक्तीचे करण्यात यावेत... खेळ अभ्यासक्रमबाह्य न ठरवता अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून खेळांकडे पाहिलं जावं... विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि क्रीडा गुणांनुसार त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जावं... यूनिव्हर्सिटी आणि महाविद्यालयीन स्तरावर खेळांना प्रमोट करण्यात यावं... अशा काही सूचना सचिननं यामध्ये सुचविलेल्या आहेत.
क्रीडा आणि मनुष्य विकासबळ विभागानं याची अंमलबजावणी केल्यास येत्या काळात भारताची ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही कामगिरी उंचावेल असा विश्वास सचिननं व्यक्त केलाय. एचआरडी मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार कपिल सिब्बल यांना सचिनचा हा प्रस्ताव पसंत पडलाय यामुळेच त्यांनी सचिन तेंडुलकरला या विषयावर आणखी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलंय.