रिओ : विकास कृष्णन यादव ७५ किलो वजनी गटात विनिंग पंच लगावण्यास सज्ज आहे.
मिडलवेट कॅटेगरीत विकासवर भारताची मदार आहे. २००८ मध्ये मिडलवेट कॅटेगरीतच विजेंदर सिंगनं ब्राँझ मेडल जिंकलं होतं. त्यामुळे विकास याची पुनरावृत्ती करणार का? याकडे बॉक्सिंगप्रेमींचं लक्ष असेल.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये खराब पंचगिरीचा फटका बसल्यानं विकास कृष्णन या गुणवान बॉक्सरला लीग मॅचेसमधूनच एक्झिट घ्यावी लागली होती. या घटनेनंतर त्यानं या विरोधात लढाईही लढली. मात्र, त्याला न्याय मिळाला नाही. आता जखमी वाघाप्रमाणे पुन्हा बॉक्सिंगच्या रिंगणात तो प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारण्यास सज्ज झालाय.
७५ किलो वजनीगटामध्ये तो खेळणार आहे. याच वजनीगटात विजेंदरनं २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल पटकावून दिलं होतं. बॉक्सिंगची पंढरी असलेल्या भिवानीतूनच विकासनं बॉक्सिंगचे धडे घेतलेत. भिवानीनं आजवर भारताला अनेक नामवंत बॉक्सर दिलेत. आणि याच मुशीत तयार झालाय विकास कृष्णन नावाचा आक्रमक बॉक्सर.... रियो ऑलिम्पिकमध्ये त्याला एकमागून एक आव्हानं पार करत भारतासाठी मेडलची कमाई करण्याचं चॅलेंज असेल.
२०१० एशियन युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यानं गोल्ड मेडल जिंकत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये दिमाखदार पदार्पण केलं होतं. त्यानंतर याच वर्षी युथ ऑलिम्पिक्समध्ये ब्राँझ मेडल जिंकत विकासनं पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. तर २०१० मध्येच युथ वर्ल्ड अॅमॅच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही लाईटवेट गटात गोल्ड मेडलला गवसणी घातली होती. २०१० एशियन गेम्समध्ये त्यानं गोल्ड मेडल पटकावलं होतं. २०११ वर्ल्ड अॅमॅच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यानं ब्राँझ मेडल जिंकलं होतं. २०१४ एशियन गेम्समध्येही विकासनं ब्राँझ मेडलवर कब्जा केला होता. तर २०१५ एशियन गेम्समध्ये त्याचं गोल्ड मेडल हुकलं होतं. त्याला सिल्व्हर मेडलवरच समाधान मानावं लागलं होतं.
मिडलवेट कॅटेगरीमध्ये विकस कृष्णननं आपली वेगळी छाप सोडली आहे. २०१२ मध्ये त्याचं मेडलचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. आता २०१६ मध्ये विकासचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न सत्यात उतरणार का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे?