स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचा मोहम्मद इरफान निलंबित

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफानला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे.

Updated: Mar 14, 2017, 04:15 PM IST
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचा मोहम्मद इरफान निलंबित  title=

लाहोर : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफानला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. पाकिस्तान सुपर लीग या टी20 स्पर्धेवेळी झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ही कारवाई केली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये इरफानला खेळता येणार नाही.

लाहोरमध्ये अॅण्टी करप्शन युनीटकडून मोहम्मद इरफानची चौकशी करण्यात आली. पाकिस्तान सुपर लीगवेळी बुकींनी इरफानशी संपर्क केले होते, पण इरफाननं ही गोष्ट अॅण्टी करप्शन युनीटला सांगितली नाही, अशी बातमी डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिली आहे.

वर्षभरामध्येच आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे मी दु:खी होतो म्हणून बुकींनी संपर्क केल्याचं मी सांगितलं नसल्याचा दावा इरफाननं केला. पण यानंतरही इरफानचं निलंबन करण्यात आलं. पुढच्या १४ दिवसांमध्ये या कारवाईवर इरफानला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उत्तर द्यावं लागणार आहे. याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्येच स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून शरजील खान आणि खालिद लतीफ यांचंही निलंबन करण्यात आलं होतं.