प्रो कबड्डीच्या लिलावात या खेळाडूला मिळाले सर्वाधिक पैसे...

आयपीएलची सांगता झाली की लगेचच बिगुल वाजतो तो प्रो-कबड्डीचा... प्रो-कबड्डीच्या नव्या सीझनसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव झाला... या लिलावात कोणी बाजी मारली आणि यंदाच्या हंगामात काय नवं असेल, पाहूयात हा रिपोर्ट...

Updated: May 23, 2017, 07:20 PM IST
प्रो कबड्डीच्या लिलावात या खेळाडूला मिळाले सर्वाधिक पैसे... title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई  : आयपीएलची सांगता झाली की लगेचच बिगुल वाजतो तो प्रो-कबड्डीचा... प्रो-कबड्डीच्या नव्या सीझनसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव झाला... या लिलावात कोणी बाजी मारली आणि यंदाच्या हंगामात काय नवं असेल, पाहूयात हा रिपोर्ट...

प्रो-कबड्डीचा यंदाचा पाचवा हंगाम... या हंगामात अनेक बदल करण्यात आलेत. वाढीव 4 टीम्स, दीर्घकाळ चालणारी प्रो-कबड्डी यामुळं प्रो-कबड्डीची क्रेझ आणखी वाढणार की त्याचा उलटा परिणाम होणार याबाबत सध्या कबड्डी विश्वात जोरदार चर्चा सुरुय. क्रिकेटचा देव, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदा तामिळनाडू टीमचा सहमालक बनलाय. यामुळं क्रिकेटचे चाहतेही आपसूकच प्रो-कबड्डीकडं वळतील, अशी आशा आहे.

यंदाच्या हंगामात एकूण 12 टीम्स मैदानात उतरतील. उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरात या चार नव्या टीम्सचा यंदाच्या हंगामात समावेश करण्यात आलाय. 28 जुलै ते 28 ऑक्टोबर म्हणजे तब्बल तीन महिने एवढी दीर्घकाळ यंदाची प्रो-कबड्डी स्पर्धा सुरु असणाराय. 130 हून अधिक सामने यंदाच्या हंगामात खेळले जाणार आहेत.

यंदाचा प्रो कबड्डीचा उदघाटन सोहळादेखील आयपीएल उदघाटन सोहळ्याप्रमाणं भव्यदिव्य करण्यात येणाराय. यंदाच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला.

कोणाला मिळाले किती रुपये...

यंदाच्या लिलावात नितीन तोमर हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. 

नितीन तोमरला उत्तर प्रदेशनं 93 लाखांना खरेदी केलं. 

तर रोहित कुमारला बंगळुरु बुल्सनं 81 लाखांना खरेदी केलं. 

मनजीत चिल्लरला जयपूर पिंक पँथरनं 75.5 लाखांना खरेदी केलं

सुरजित सिंगला बंगाल वॉरियर्सनं 73 लाखांना खरेदी केलं

राजेश नरवालला उत्तर प्रदेशनं 69 लाखांना खरेदी केलं

 संदीप नरवालला पुणेरी पलटणनं 66 लाखांना खरेदी केलं

अमित हुडाला तामिळनाडूनं 63 लाखांना खरेदी केलं. 

हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असलेला काशिलिंग आडके यंदा मुंबईकडून खेळताना दिसेल. याखेरीज इराणी खेळाडूंचाही लिलावात दबदबा राहिला. इराणचा बचावपटू अबोझर मोहजरमिघानला गुजरात टीमनं 50 लाखांना खरेदी केलं. इराणच्या राष्ट्रीय टीममधील अनेक खेळाडूंसाठी सगळ्याच टीम्सनी बोली लावली.

यंदाची प्रो-कबड्डी याआधीच्या चार हंगामांपेक्षा आगळी-वेगळी करायची असा चंगच आयोजकांना बांधलाय. आता त्यात कितपत यश मिळतं हे प्रो-कबड्डी सुरु झाल्यावरच स्पष्ट होईल.