मुंबई : इंडियन प्रीमियल लीग(आयपीएल) च्या नवव्या हंगामासाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे. या हंगामात मैदानात उपस्थित प्रेक्षकांनाही थर्ड अम्पायरला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपले मत देता येणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली.
मैदानात उपस्थित प्रेक्षकांना एक प्लेकार्ड देण्यात येईल त्यावर आऊट अथवा नॉट आऊट असे लिहिले असेल. कॅमेऱ्याल प्रेक्षकांचे मत दाखवले जाईल. मात्र या प्रकरणात अंतिम निर्णय थर्ड अम्पायरचाच असेल, असे शुक्ला म्हणाले. प्रेक्षकांच्या मताचा थर्ड अम्पायरच्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नाही.
थर्ड अम्पायर टीव्ही रिप्ले पाहूनच निर्णय घेईल. या निर्णयामुळे आयपीएल पाहणाऱ्यांची संख्या वाढेल असा विश्वास शुक्ला यांना वाटतो. आठ एप्रिलला मुंबईच्या वरळीमध्ये आयपीएलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री कटरिना कैफ, अभिनेता रणवीर सिंग यांच्यासह जॅकलीन फर्नांडिस आणि योयो हनी सिंग परफॉर्म करतील.