नवी दिल्ली: आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं सुरू असलेल्या 'आयसीसी'च्या वार्षिक परिषदेत संघटनेच्या सर्व ५२ सदस्यांनी श्रीनिवासन यांच्या पारड्यात मतं टाकली. त्यामुळं श्रीनिवासन यांच्या निवडीवर बिनविरोध शिक्कामोर्तब झालं. आयसीसीमध्ये घटनात्मक बदल झाल्यानंतर श्रीनिवासन हे पहिले चेअरमन बनले आहेत. श्रीनिवासन पुढील आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत.
संविधान बदलानंतर आयसीसीच्या चेअरमनकडे जास्त अधिकार देण्यात आले आहेत. याआधी आयसीसीच्या अध्यक्षाकडे सर्वाधिकार होते. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मुस्तफा कमाल हे आयसीसीचे नवे अध्यक्ष होतील.
श्रीनिवासन यांना 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं असलं तरी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होण्यास कोणतीही हरकत नसल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं होतं. त्यानंतर 'बीसीसीआय'नं श्रीनिवासन यांच्या नावाची 'आयसीसी'च्या सर्वोच्चपदासाठी शिफारस केली होती. ही शिफारस स्वीकारत 'आयसीसी'च्या सदस्य देशांनी 'बीसीसीआय'च्या पारड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थानपनातलं सर्वोच्च पद टाकलं. '
आयपीएलमधील मोठ्या वादानंतर एन. श्रीनिवासन यांचं हे पुनरागमन मानलं जात आहे. आयपीएल सट्टेबाजीमध्ये जावई मय्यपन यांचं नाव आल्यावर श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
दरम्यान, 'आयसीसी'च्या अध्यक्षपदी झालेली निवड ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असून जगभरात क्रिकेटचा प्रसार करण्याचा आपला प्रयत्न राहिल, अशी प्रतिक्रिया श्रीनिवासन यांनी व्यक्त केली आहे. श्रीनिवासन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.