दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनची यंदाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलला पाठिंबा दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र मिळून ही निवडणूक लढवतायत.
क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल, ते सांगता येत नाही... राजकारणाचंही अगदी तसंच आहे. आणि क्रिकेटसाठी रंगणारं राजकारण असेल तर...? MCAची १७ जूनला होणारी द्वैवार्षिक निवडणूक क्रिकेटच्या मॅचसारखीच उत्कंठावर्धक असणार आहे. कारण काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा असा आगळावेगळा सामना इथं बघायला मिळणाराय... राष्ट्रवादीचे शरद पवार बाळ महाडदळकर पॅनलमधून पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवतायत. तर त्यांच्याच गटातून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपाध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेत. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतरच, राष्ट्रवादी आणि भाजप साथ साथ मैदानात उतरलेत, हे विशेष... आता तर आशिष शेलार यांनी उपाध्यक्षपदासोबतच अध्यक्षपदासाठीही अर्ज भरलाय.
दुसरीकडे काँग्रेसचे विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केलाय. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि खासदार राहुल शेवाळे उपाध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेत.
हे कमी झालं म्हणून की काय, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे देखील अपक्ष म्हणून MCA निवडणुकीच्या रणधुमाळीत सामील झालेत. या निवडणुकीत ३२९ मतदार मतदान करणार असून, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. परिणामी MCA ची निवडणूक राजकीय आखाडा बनलीय. आता ११ जूनपर्यंत म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत कोण कोण मैदानात टिकतायेत, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.