दुबई : आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे. या नव्या रॅकिंगनुसार झिम्बाब्वेविरुद्ध चांगलं प्रदर्शन करणारा भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बुमराहनं तीन मॅचच्या या सीरिजमध्ये पाच विकेट घेतल्या होत्या.
नव्या रॅकिंगमध्ये आर.अश्विनचं मात्र चार स्थानांचं नुकसान झालं आहे. या रॅकिंगमध्ये अश्विन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. बॉलरच्या या रॅकिंगमध्ये वेस्ट इंडिजचा स्पिनर सॅम्युअल बद्री पहिल्या क्रमांकावर कायम आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सीरिजमधला भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर बरिंदर सरनला या रॅकिंगमध्ये 225 वं स्थान मिळालं आहे.
बॅट्समनच्या यादीमध्ये विराट कोहली टी 20 रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिंच दुसऱ्या तर न्यूझिलंडचा मार्टिन गुप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध खेळणारे मनदीप सिंग 100 व्या, लोकेश राहुल 102 व्या, मनिष पांडे 152 व्या, अंबाती रायडू 217 व्या, केदार जाधव 106 व्या क्रमांकावर आहेत.
झिम्बाब्वेविरुद्धची सीरिज भारत जर 3-0 नं जिंकला असता तर या क्रमवारीत तो एक नंबरला पोहोचला असता, पण 2-1 नं ही सीरिज जिंकल्यानं भारत 128 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझिलंड 132 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.