नवी दिल्ली: दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
आशियाई स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरीत सरिता देवीनं दक्षिण कोरियाच्या पार्क जिनावर वर्चस्व गाजवलेलं असतानाही पंचानी सरिता देवीविरोधात निकाल दिला. या निर्णयाच्या निषेधार्थ सरिता देवीनं कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला.
तिच्या या कृतीची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं गंभीर दखल घेत तिला अनिश्चित काळासाठी निलंबित केलं होतं. नंतर सरिता देवीनं या प्रकरणी माफीही मागितली होती. मात्र आज तिच्यावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय असोसिएशननं जाहीर केला. या बंदीनंतर सरिता देवी हिला आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संस्थेचा अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
दरम्यान सरीतादेवीनं ब्रॉन्झ पदक स्वीकारलं आहे. काहीवेळा भावनेच्या भरात सरीतादेवीनं केली तशी चूक होते, तरी तिच्यावर कठोर कारवाई करू नये अशी मागणी भारतातल्या अनेक खेळाडूंनी यापूर्वी केली होती. तरीही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं एक वर्षाची बंदी घातली असून आता भारत सरकार तिच्यासाठी रदबदली करताना दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.