चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवताना नवा इतिहास रचलाय. यासोबतच भारताने इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा व्हाईटवॉश दिलाय. 84 वर्षांत पहिल्यांदाच सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय.
या विजयासह इंग्लंडविरुद्ध तब्बल 8 वर्षानंतर भारताने मालिका जिंकलीये. 2008मध्ये भारताने इंग्लंडला 1-0ने हरवले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यात भारताला यश आले नव्हते. मात्र कोहली अँड कंपनीने हे करुन दाखवले.
घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मिळवलेला भारताचा हा ऐतिहासिक मालिका विजय आहे. यासोबतच विराट अँड कंपनीने इंग्लंडकडून पराभवाचा बदला घेतला.
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताने सरस कामगिरी केली. इंग्लंडने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 477 धावांवर त्यांचा पहिला डाव संपला.
त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने तब्बल 759 धावांचा डोंगर उभारला. यात करुण नायरच्या नाबाद 303 धावांचा समावेश आहे. तसेच लोकेश राहुलच्या 199, पार्थिव पटेल 71, आर. अश्विन 67, रवींद्र जडेजा 51 यांनीही चांगली खेळी केली.
इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ 207 धावा करता आल्या. यासोबतच पाचव्या कसोटीत भारताने एक डाव 75 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या.
मॅन ऑफ दी मॅच - करुण नायर
मॅन ऑफ दी सिरीज - विराट कोहली