वर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच  वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 

PTI | Updated: Mar 5, 2015, 02:31 PM IST
वर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय title=

नेल्सन: वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच  वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 

आज वर्ल्डकपमध्ये बांग्लादेश आणि स्कॉटलंड या टीम आमने सामने होत्या. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंडचा ओपनर कायल कोएत्झरनं १३४ बॉल्समध्ये १५६ रन्सची तडाखेबाज खेळी करत टीमला ३०० रन्सचा टप्पा ओलांडून दिला. त्याला प्रिस्टन मोमसेन ३९ रन आणि मॅट मॅचन ३५ रन यांनी मोलाची साथ दिली. स्कॉटलँडनं ५० ओव्हरमध्ये ३१८ रन्सची विक्रमी धावसंख्या उभारली. बांग्लादेशतर्फे तस्किन अहमदनं सर्वाधिक ३ तर नासीर हुसेननं दोन विकेट घेतल्या. 

स्कॉटलंडचे ३१९ रन्सचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशची सलामीची जोडी अपयशी ठरली. सौम्य सरकार अवघ्या २ रनवर आऊट झाल्यानं बांग्लादेशची अवस्था १ आऊट ५ रन्स अशी होती. मात्र त्यानंतर तमिम इक्बालनं (९५ रन्स) आणि महमुदूल्लाह (६२ रन्स) या जोडीनं १३९ रन्सची पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. ही जोडी परतल्यावर मोहम्मद रहीम (६० रन्स) शकीब अल हसन (नॉटआऊट ५२ रन्स) यांनी संघाला विजयाच्या समीप नेलं. मोहम्मद रहीम आऊट झाल्यावर शब्बीर रेहमाननं नॉटआऊच ४२ रन्सची खेळी करत हसनला साथ दिली. शकीब अल हसननं  ४८ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार मारत टीमला दिमाखदार विजय मिळवून दिला. बांग्लादेशच्या चार बॅट्समननी मौल्यवान हाफसेंच्युरी ठोकत टीम विनिंगचा उत्तम नमूनाच सादर केला. स्कॉटलंडचा सलामीवीर कोएत्झरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 

लिंबू टिंबू संघाची लढत म्हणून या मॅचकडे बघितलं जात असलं तरी या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनी मिळून एकूण ६४० रन्स केले. वर्ल्डकपमध्ये एवढे रन्स झालेली ही आठवी मॅच आहे. 

बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आला असून स्कॉटलंडला अजूनही वर्ल्डकपमध्ये विजयाची प्रतिक्षा आहे. स्कॉटलंडनं आतापर्यंत वर्ल्डकपमधील सर्व मॅच गमावल्या आहे. बांग्लादेशची पुढील मॅच इंग्लंड आणि बलाढ्य न्यूझीलंडसोबत आहे. यापैकी एका मॅचमध्ये विजय मिळवल्यास बांग्लादेश क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.