रिओ : ब्राझीलच्या रिओ दी जानिरोमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक यश मिळवले. मात्र हे यश तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते.
फायनलपर्यंतची फेरी गाठण्यासाठी तिला मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना नमवावे लागले. हि तिची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती आणि पहिल्याच स्पर्धेत तिने रुपेरी यश मिळवत बॅडमिंटनच्या इतिहासात आपले नाव रुपेरी अक्षरांनी नोंदवले.
ऑलिम्पिसाठी पात्र ठरल्यानंतर तिची मेहनत खडतर होती. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर सिंधूचे कोच पी. गोपीचंद यांनी अनेक खुलासे केले. गेल्या तीन महिन्यांपासून ती फोन वापरत नव्हती. तसेच तिला आवडीचे आईस्क्रीम तसेच हैदराबादी बिर्याणी खाण्यास दिली नव्हती.
मात्र ऑलिम्पिक पदकानंतर तिला आईस्क्रीम खाण्यास हरकत नसल्याचे तसेच तिला फोन परत देणार असल्याचे गोपीचंद यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांची तिची मेहनत फळाला आली. सिंधूच्या खडतर मेहतनीसोबत तिचे गुरु गोपीचंद यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची. तिच्या खाण्यापिण्याकडे, व्यायामाकडे असे सर्वांगीण लक्ष त्यांनी पुरवले होते. त्यामुळे सिंधूला इतका मोठा पल्ला गाठता आला.