मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दावा खोटा असल्याचं भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटलं आहे. राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याचा आपण विचारही केला नव्हता, असेही चॅपेल यांनी स्पष्ट केले आहे.
२००७ च्या विश्वचषकापूर्वी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना द्रविडची कर्णधारपदावरून हकालपट्टी करायची होती, त्यांना द्रविडला हटवून भारतीय क्रिकेटवर राज्य करायचे होते, असे सचिनने आपल्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे. यावर स्पष्टीकरण देताना चॅपेल म्हणाले की, "प्रशिक्षकपदाच्या माझ्या कारकिर्दीत मी कधीही द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याचा विचारही केलेला नाही, तसेच आ माझी कधीच इच्छा झाली नाही, असंही चॅपेल यांनी स्पष्ट केलं आहे.
सचिनच्या आत्मचरित्रातील मुद्दे मला आश्चर्यचकीत करणारे आहेत." तसेच त्या काळात एकदाच सचिनच्या घरी गेलो असून त्याच्या पायाला दुखापत झाली होती म्हणून सचिनला पाहायला गेलो होतो. विशेष म्हणजे त्यावेळी माझ्यासोबत फिजिओथेरपिस्ट आणि सहाय्यक प्रशिक्षक देखील होते. राहुल द्रविडला कर्णधार पदावरून हटवून सचिनला कर्णधार बनवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असेही चॅपेल पुढे म्हणाले.
चॅपेल २००७ च्या विश्वचषकाच्या महिन्याभरापूर्वी एकदा घरी आले होते. त्यावेळी त्यांनी द्रविडला कर्णधारपदावरून दूर करण्याबाबत सांगितले. त्यावेळी आपल्या बाजूला पत्नी अंजलीही बसली होती. आम्ही दोघेही त्यावेळी अवाक झालो, दोघांनाही धक्का बसला. त्यानंतर त्यांनी 'आपण दोघे एकत्र येऊन भारतीय क्रिकेटवर राज्य करू' असे म्हटले होते, असा गौप्यस्फोट सचिनने आत्मचरित्रात केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.