मुंबई : स्कॉटलंडच्या ग्लास्गोमध्ये क्रीडा जगतातील क्रीडापटूंचा महामेळा भरणार आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्तानं जगभरातील ऍथलिट्समध्ये मेडल पटकावण्यासाठी घमासान होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना जगभरातील क्रीडापटूंचा खेळ पाहण्याची नामी संधी मिळणार आहे. तब्बल 12 दिवस क्रीडापटू मेडल पटकावण्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत.
भारतीय वेळेनुसार आज रात्री 1.30 वाजल्याच्या सुमारास कॉमनवेल्थच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे... तब्बल 71 देश... 17 क्रीडा प्रकार... आणि 261 मेडल्ससाठी घमासान यानिमित्तानं दिसणार आहे.
स्कॉटलंडच्या ग्लास्गोमध्ये एकेक मेडल जिंकण्यासाठी जगभारातील क्रीडापटूंमध्ये युद्ध रंगणार आहे. वेगवेगळ्या 17 क्रीडा प्रकारात 71 देशाचे क्रीडापटू 261 मेडल इव्हेंटसाठी लढणार आहेत. भारत कॉमनवेल्थमध्ये 2010 च्या कामगिरीची पुनरावृत्ती कऱण्यास आतूर असेल. दिल्ली कॉमनवेल्थमध्ये भारतीय क्रीडापटूंनी मेडल्सची सेंच्युरी लगावली होती.
भारतानं या कॉमनवेल्थसाठी तब्बल 224 ऍथलीट्स ग्लास्गोला पाठवले आहेत. यामध्ये 7 पॅरा ऍथलिट्सचा समावेश आहे. दिल्ली कॉमनवेल्थमध्ये भारतीय ऍथलिट्सना कमालीचं यश मिळालं होतं. होम ऍडव्हान्टेज असल्यानं भारतानं या कॉमनवेल्थमध्ये शानदार कामगिरी केली होती. भारतानं 2010 च्या कॉमवेल्थ गेम्समध्ये तब्बल 101 मेडल्सची कमाई केली होती. यामध्ये 38 गोल्ड, 27 सिल्व्हर आणि 36 ब्राँझ मेडलचा समावेश होता.
भारत आता 2014 मध्येही मेडल टॅलीमध्ये आपलं दुसरं स्थान कायम राखण्यास आतूर असेल. भारताच्या शूटर्सकडून या कॉमनवेल्थमध्ये मोठ्या अपेक्षा असतील. 2010 मध्ये शूटर्सनी तब्बल 30 मेडल्स पटकावली होती. मात्र, आता गेल्या कॉमनवेल्थमधील शूटिंगचे 17 इव्हेटंस ग्लास्गोमध्ये नसणार आहेत. कुस्ती, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्येही भारतीय टीमला मेडल्सची अपेक्षा असेल. टेनिस आणि आर्चरी या कॉमनवेल्थमध्ये नसल्यानं भारताच्या मेडल्सच्या संख्येत घट होणार आहे. सायना नेहवाल खेळत नसल्यानं बॅडमिंटनची सारी धुरा सिंधूवर असेल. आता भारतीय टीम 2010 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास यशस्वी ठरते का याकडेच भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.