नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीकडेच कर्णधारपद देण्यात यावं अशी मागणी होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधारपद भूषविणाऱ्या विराट कोहली याच्याकडेच पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात यावे, असे इयान चॅपेल यांनी म्हटलंय.
कोहलीने ऍडलेड कसोटीत दोन्ही डावात जिगरबाज शतके झळकाविली. पण, त्याला सामना वाचविण्यात अपयश आले. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 48 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर चॅपेल यांनी कोहलीच्या नेतृत्वाबद्दल आपले मत व्यक्त केले.
चॅपेल म्हणाले, "कसोटी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याकडून कोहलीकडे नेतृत्व देण्याची हिच योग्य वेळ आहे. कोहलीने पहिल्या कसोटीत दाखविलेले नेतृत्वगुण ओळखून निवड समितीने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली पाहिजे. या वेळेला त्याने धोनीला मागे टाकले आहे, यात काही शंकाच नाही. त्याने आपल्याकडील गोलंदाजांना योग्यपद्धतीने वापरून घेतले.
तसेच सध्या तो हंगामी कर्णधार असला, तरी त्याच्यामध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारण्याची क्षमता आहे. त्याने बेधडकपणे केलेली फलंदाजी आणि त्याची शारिरीक क्षमता उत्तम आहे. त्याच्या खेळीने प्रतिस्पर्ध्यांनाही एक इशारा दिला आहे." असं चॅपेल यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.