पर्थ : विराट कोहलीने 'हिंदुस्तान टाईम्स' च्या पत्रकाराला काहीही संबंध नसतांना शिवीगाळ केली, या प्रकरणी बीसीसीआयनं विराट कोहलीला समजूत दिलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि जगभरातल्या मीडियातून या प्रकरणावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेसमोर बीसीसीआयलाही नमतं घ्यावं लागलं.
यापूर्वी या प्रकरणात विराट कोहलीसह बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनानं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात बीसीसीआयनं भारतीय संघव्यवस्थापनाशी बातचीत केली असून, असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी पाठवलेल्या ई-मेलद्वारे अशी सक्त ताकीद दिलीय.
क्रिकेटच्या प्रसार आणि प्रचारात मीडियाचं योगदान मोठं असून बीसीसीआयला त्याविषयी आदर वाटतो, असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाची प्रतिष्ठा मलिन होईल, असं वर्तन भविष्यात टाळण्याचा सल्लाही विराटला देण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.