बांग्लादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांग्लादेशचा 108 रननी ऐतिहासिक विजय झाला आहे.

Updated: Oct 30, 2016, 05:25 PM IST
बांग्लादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय  title=

ढाका : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांग्लादेशचा 108 रननी ऐतिहासिक विजय झाला आहे. या विजयामुळे बांग्लादेशनं ही सीरिज 1-1नं बरोबरीत सोडवली आहे. बांग्लादेशच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो बांग्लादेशच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो ऑफ स्पिनर मेहदी हसन. मेहदीनं या मॅचमध्ये तब्बल 12 विकेट घेतल्या.

विजयासाठी 273 रनचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला ओपनर कूक आणि डकेटनं शंभर रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. चहापानानंतर मात्र इंग्लंडचा डाव गडगडला आणि त्यांचा 164 रनवर ऑल आऊट झाला. चहापानानंतरच्या खेळामध्ये सगळ्या दहा विकेट गमवण्याची नामुष्कीही इंग्लंडवर ओढावली. या इनिंगमध्ये मेहदीनं पाच विकेट घेतल्या तर पहिल्या इनिंगमध्ये मेहदीला सात विकेट घेण्यात यश आलं.

त्याआधी या मॅचमध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये 220 रन बनवल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडनं 244 रन बनवत 24 रनची माफक आघाडी घेतली. बॅट्समननी मिळवून दिलेल्या या आघाडीचा फायदा इंग्लंडच्या बॉलरना घेता आला नाही, यामुळे बांग्लादेशला दुसऱ्या इनिंगमध्ये 296 रनचा डोंगर उभारून इंग्लंडपुढे 273 रनचं लक्ष्य ठेवता आलं. 

मॅचमध्ये 12 विकेट आणि सीरिजमध्ये 19 विकेट घेणाऱ्या मेहदी हसनला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिजनं गौरवण्यात आलं. महत्त्वाच्या अशा भारत दौऱ्याआधी झालेल्या या पराभवामुळे इंग्लंडच्या चिंता मात्र नक्कीच वाढल्या आहेत. 9 नोव्हेंबरपासून इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी-20 चा समावेश आहे.