इंचिऑन: भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली.
भारतानं या स्पर्धेत टेनिसची त्या अर्थानं दुसरी फळी कोर्टवर उतरवली होती. त्यामुळं पाच पदके ही तशी उल्लेखनिय कामगिरी म्हणावी लागेल. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित सानिया-साकेत जोडीनं तैपेईच्या हाओ चिंग चान - सिएन यिन पेंग जोडीवर ६-४, ६-३ अशी मात केली. ही लढत ६९ मिनिटे चालली.
पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत असलेल्या मायनेनीनं आपल्या जोरदार सर्व्हिसच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. शिवाय, नेटजवळच्या त्याच्या खेळानंही प्रतिस्पर्ध्यांना चकित केलं. टेनिसमध्ये या वेळी युकी भांबरीनं पुरुषांच्या एकेरी आणि दुहेरीत (दिविज शरणसह) ब्राँझ जिंकलं, तर सानिया-प्रार्थना ठोंबरे यांनी महिलांच्या दुहेरीत ब्राँझपदकाची कमाई केली. सानियानं आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण ८ पदकं आतापर्यंत पटकाविली आहेत.
ग्वाँझू आशियाईत भारतानं दोन सुवर्णपदकांसह पाच पदकं मिळवली होती. या वेळी लिअँडर पेस, सोमदेव देववर्मन, रोहन बोपण्णा यांनी स्पर्धेतून माघार घेतली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.