मुंबई : भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे. अनिल कुंबळेचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपत आहे. पण कुंबळेला थेट कार्यकाळ वाढवून न देण्याचा पवित्रा बीसीसीआयनं घेतला आहे. पगारवाढीची मागणी केल्यामुळे बीसीसीआय नाराज झाली आणि हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारताचा कोच होणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावेत असं बीसीसीआयनं सांगितलं आहे. या इच्छुकांचे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांची समिती मुलाखत घेणार आहे. दरम्यान यासाठी अनिल कुंबळेला कोणताही अर्ज द्यावा लागणार नाही. मुलाखतीसाठी त्याला डायरेक्ट एन्ट्री मिळणार आहे.
कोच म्हणून अनिल कुंबळेची कारकिर्द चांगलीच प्रभावी राहिली आहे. या मोसमामध्ये भारतानं घरच्या मैदानात खेळलेल्या १३ टेस्टपैकी १० टेस्टमध्ये विजय मिळवला, तर फक्त एकाच मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुण्यातल्या टेस्टमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.