आज भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे, मॅच धोक्यात

कोची इथं आजपासून भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे मॅच होणार आहे. वनडे सीरिज सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचं अस्त्र उगारलंय. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या सीरिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

PTI | Updated: Oct 8, 2014, 12:52 PM IST
आज भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे, मॅच धोक्यात  title=

कोची: कोची इथं आजपासून भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे मॅच होणार आहे. वनडे सीरिज सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचं अस्त्र उगारलंय. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या सीरिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

वेस्ट इंडीज संघ पाच वनडे मॅचच्या सीरिजसाठी भारतात आलाय. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप टीमच्या निवडीसाठी ही सीरिज भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. मात्र या मालिकेच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये करारावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. क्रिकेट बोर्डानं केलेल्या नवीन करारात वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये भरभक्कम कपात करण्यात आली आहे. बोर्डाच्या या करारामुळे संघाचे मनोबल घटलं असून परिस्थितीवर तोडगा निघाला नाही तर खेळाडू स्वतःच्या हातात सूत्र घेतील असं वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्होनं एका पत्रात म्हटलंय.

वेस्ट इंडीज संघानं मंगळवारी सरावही केला नव्हता तसंच त्यांनी पत्रकार परिषदेला येणं टाळलं होतं. वेस्ट इंडीज क्रिकेटपटूंनी संपाचा इशारा दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानंही बीसीसीआयला पत्र पाठवून माफी मागितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आमचे खेळाडू पहिल्या सामन्यात सहभागी होणार नसून यामुळं होणाऱ्या नुकसानासाठी चाहते आणि बीसीसीआयची आम्ही माफी मागतो, असा स्पष्ट उल्लेख केल्याचं समजतंय. त्यामुळं आजची मॅच होते की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.