www.24taas.com, झी मीडिया, पुणे
‘येरवडा केंद्रीय जेल’च्या उंचच उंच भींतीच्या मागे शांतता पसरलीय... इथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला ओझरतं का होईना पण पाहायची इच्छा आहे.... त्यासाठी त्यांची नजर जेलवर टिकून आहे.
१९९३ सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटासंदर्भातील एका खटल्यात संजयला ४२ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीय. ही शिक्षा पूर्ण करण्यासाठी संजयला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलंय. १६ मे रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर संजयनं आर्थर रोड कारागृहात सहा रात्री काढल्या. २२ मे रोजी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून त्याला येरवड्यात हलवण्यात आलं. याच जेलमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनाही कैद करून ठेवण्यात आलं होतं.
या जेलमध्ये दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांना प्रश्न पडला होता की, संजय दत्तला शारीरिक श्रमासाठी काम काय द्यायचं? जेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक कैद्याला इथं आल्यानंतर काही ना काही काम करावं लागतं. जेल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘सुरक्षेच्या कारणास्तव संजयला वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलंय. जेल मॅन्युअलनुसार त्याला कोणतं काम द्यावं याबद्दल निर्णय घेण्यात येईल.’
‘कैदी क्रमांक १६६५६’ हा बिल्ला परिधान केलेला संजय दत्त तिसऱ्यांदा येरवड्यात दाखल झालाय. जेलमध्ये गेलेल्या संजयला धक्क्यातून सावरायला वेळ लागतोय पण तो दिनचर्यचं पालन न चुकता करतोय. सकाळी साडे सात वाजता नाश्ता, दुपारी ११.३० वाजता दुपारचं भोजन आणि संध्याकाळी साडे सहा वाजता रात्रीचं जेवण त्यानं घेतलं. दररोजच्या दिनचर्येबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त डीजीपी (जेल) मीरा बोरवणकर यांनी दिलीय. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, संजयला केवळ न्यायालयाद्वारे दिल्या गेलेल्या सवलती मिळतील. न्यायालयानं संजय दत्तला जास्तीत जास्त एका महिन्याची सूट दिलेली आहे.
संजय दत्तला गेल्या वेळेस येरवड्यात खुर्च्या बनवण्याचं काम दिलं गेलं होतं. या कारागृहात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर तयार केलं जातं आणि बाहेर विकलंही जातं. अकुशल कामगार असलेल्या संजय दत्तला टोपल्या बनवण्यासाठी प्रत्येक दिवसाचे १२.५० रुपये वेतन दिलं गेलं होतं. यावेळी संजय दत्तला हेच काम पुन्हा एकदा दिलं जाण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.