www.24taas.com, मुंबई
‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. या निकालासाठी संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्त या निकाल लागण्याआधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. संजय दत्तही चित्रीकरणात व्यस्त होता. परंतू, सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत असताना मात्र तो अस्वस्थ झाला आणि चित्रिकरण अर्ध्यावरच सोडून तो घरी परतला होता.
निकाल लागल्यानंतर मात्र संजय दत्त धीरानं पत्रकारांना सामोरं गेला. यावेळी त्यानं ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा मात्र वेगळंच सांगत होती.
सध्या बॉलिवूडमध्ये संजय दत्तवर अडीचशे कोटींपेक्षा जास्त पैसे लागले आहेत. अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये तो व्यस्त आहे. परंतू, येत्या चार आठवड्यांमध्ये संजय दत्तनं पोलिसांना शरण यावं, असे आदेश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे संजयच्या अनेक शुटींग्स रखडण्यात येतील किंवा निर्मात्यांना पर्याय शोधावा लागणार आहे.