... आणि सचिन नाराज झाला

मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 5, 2013, 08:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.
बंगाल क्रिकेट असोसिएशननं याबाबत परस्पर विरोधी माहिती दिलीय. सुजान मुखर्जी यांनी सचिन नाराज असल्याचं मान्य केलं. तर संयुक्त सचिव सुबीर गांगुली यांनी सर्व काही नियंत्रणात असल्याचं म्हटलं.
सचिन तेंडुलकर काल जसा कोलकातात दाखल झाला. बसमधून उतरताच त्याच्यावर रंगबिरंगी कागदाच्या तुकड्यांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर ८० शालेय विद्यार्थी सचिनच्या स्वागतासाठी एका रांगेत ड्रेसिंग रूमपर्यंत उभे होते. त्यांच्या प्रत्येकाच्या टी-शर्टवर सचिनचा फोटो होता आणि मागच्या बाजूला १९९ आकडा.
याशियावर बंगाल क्रिकेट असोसिएशननं ड्रेसिंग रूम बाहेर सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा उभा केला होता. मात्र हा पुतळा मादाम तुसा सारखा नव्हता. त्याच्यात आणि सचिनच्या चेहऱ्यात बराच फरक जाणवला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिननं म्हटलं की, “तो खेळापेक्षा मोठा नाहीय, इथं केवळ मीच नाही तर इतर १४ खेळाडूही टीम इंडियाचा भाग आहेत”.
कॅबचे वरिष्ठ संयुक्त सचिव मुखर्जी म्हणाले, “मी ही ऐकलंय, सचिनवर केलेल्या रंगबिरंगी कागदांच्या तुकड्यांच्या वर्षावानं आणि इतर काही कारणांनी तो नाराज झालाय. शिवाय त्यांनी भवानीपूर इथं टेंटमध्ये लावलेल्या सचिनच्या फोटोंचं प्रदर्शन बघण्याचा कार्यक्रमही रद्द केला.” माहिती मिळतेय की सचिनची नाराजगी दूर करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं नंतर मेणाच्या पुतळ्यासोबत सचिनचा फोटो काढला आणि पुतळा बनवणाऱ्या सुशांत रे या कलाकाराची स्तुतीही केली. तर दुसरीकडे कॅबचे संयुक्त सचिव गांगुली म्हणाले की, “सचिन आणि संपूर्ण टीम या भव्य तयारीनं खूश आहे”.
दोघांचंही बोलणं परस्पर विरोधी असलं, तरी सचिन नक्की कशानं नाराज झाला याचे तर्कवितर्क लावण्यात येतायेत. बहुदा सचिनला लहान मुलांना इतका वेळ तात्काळत उभं ठेवणं खटकलं असणार, असंही बोललं जातंय.
दरम्यान, सचिन तेंडुलकर आपली १९९वी टेस्ट खेळण्यासाठी कोलकातामध्ये दाखल झाला असतांना त्याचं एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विंडीज टेस्ट सीरिजनंतर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्यामुळं कोलकातावासियांना सचिनच्या बॅटिंगचा आनंद अखेरच्या वेळी अनुभवयाला मिळणार आहे. कोलकातावर तर सचिन फिव्हरच चढला आहे. ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान ही टेस्ट मॅच होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.