www.24taas.com, नवी दिल्ली
रिअलिटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या डीएलएलची कृपादृष्टी झाल्याच्या आरोपांवरून वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केले आहे. फेसबुकवर त्यांनी भारताची तुलना बनाना रिपब्लिकशी केली होती. या प्रकरणी इंडिया अगेन्स्ट करपश्नच्या अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत रॉबर्ट वडेरा यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. \
दुसरीकडे, डीएलएफ आणि वडेरा यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे जाहीर केले आहे. तर केजरीवाल यांनी मंगळवारी या प्रकरणात आणखी काही खुलासे करणार असल्याचे ट्विट करून जाहीर केले आहे.
डीएलएलसह केलेल्या कथित सौद्यांमध्ये आरोपांवरून वादात अडकलेल्या वडेरा यांनी पहिल्यांदा बोलताना सांगितले की, आपण या संदर्भात सर्व नकारात्मक गोष्टींशी सामना करण्यास तयार आहोत.
विशेष म्हणजे वडेरा यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर मँगो पिपल इन बनाना रिपब्लिक अशी कमेंट करून नवीन वाद निर्माण केला होता. त्यानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणी वडेरा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
वडेरा यांनी देशाची तुलना बनाना रिपब्लिकशी करून देशाचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असेही कुमार विश्वास यांनी सांगितले आहे.