शिवसेना आणि भुजबळांचं एकमत

बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 8, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय. ११ ऑक्टोबरला बेळगावात विधानसभेचं उदघाटन होणार आहे. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जाणार असल्याचं सांगितलं जातंय. शिवसेनेनंही राष्ट्रपतींनी या उदघाटन कार्यक्रमाला जाऊ नये, अशी मागणी केलीये.
विधानसभेच्या उद्घाटनाद्वारे कर्नाटक सरकार सीमावासीयांच्या जखमेवर मिट चोळत आहे, असा दावा सीमावासीय करत आहेत. त्यामुळे या निर्णयाविरोधात ‘महाराष्ट्र एकीकरण समीती’चे सदस्य महाराष्ट्रातील खासदार आमदारांच्या घरासमोर आंदोलन करत आहेत.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलीक यांच्या घरासमोर धरणं आंदोलन करुन निदर्शन केली. त्याचबरोबर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विधानसभेच्या उद्धाटन समारंभाला येवू नये यासाठी विनंती करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचीसुद्धा एकीकरण समीतीच्या सदस्यांनी भेट घेतली आणि त्यांनाही आपल्या मागण्याचं निवेदन दिलं.