सुप्रियाताईंचा राज ठाकरेंना टोला

जो माणूस काम करतो, त्याच्यावरच टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 15, 2013, 11:03 AM IST

www.24taas.com, परभणी
जो माणूस काम करतो, त्याच्यावरच टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
परभणीमध्ये राष्ट्रवादीतर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे राज ठाकरेंचा अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा. त्याचं तेवढ कामचं असतं. आणि टीका केलेलं चांगलं असतं. कसं आहे जो माणूस काम करतो त्याच्यावर टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका कोण करणार....त्यामुळे राज ठाकरे यांची टीका आम्ही कॉम्पिमेंट म्हणून घेतो. असाही टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
यापूर्वी २७ जुलै २०१२ रोजी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांना जॉनी लिव्हरची उपमा दिला होती. राज ठाकरे राजकारणातील जॉनी लिव्हर आहे, असे अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंनी म्हटले होते.

----
राज नौटंकी बंद करा – अजित पवार
दरम्यान, राज ठाकरे नौटंकी बंद करा... केवळ विदुषकी चाळे करून करमणूक होते मात्र प्रश्न सुटत नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
दोन दिवसांपूर्वी, कोल्हापुरातल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या भाषणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे मात्र नाशिकचे कोणते प्रश्न आत्तापर्यंत सोडवलेत? असा सवाल अजित पवारांनी विचारलाय.
‘याला ठोक, त्याला ठोक म्हणता, तुमच्या काय बापाचं राज्य आहे का...? राजकीय पक्षाच्या नावाखाली राज ठाकरेंनी ऑर्केस्ट्रा सुरु केला आहे. त्यांनी ही नौटंकी बंद करावी. विदूषकी चाळ्यांनी, नकला करुन लोकांचे प्रश्न सुटले असते, तर आम्हीही नकला केल्या असत्या. नाशिकमध्ये सत्ता दिली, तर त्यांनी काय केलं हे सगळे पाहात आहेत. तोडपाणी झाल्यावर मनसेने टोलविरोधी आंदोलनंही आटोपतं घेतलं` असं म्हणत दादांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
‘नौटंकी बंद करा’ असा सल्ला देतानाच विदूषकी चाळे करून प्रश्न सुटत नाहीत, असा सल्लाही अजितदादांनी यावेळी राज ठाकरेंना दिलाय.
कोल्हापूरच्या आपल्या भाषणात राज ठाकरेंनी अनेक नेत्यांवर टीका केली होती. नेहमीप्रमाणेच या भाषणातही राज ठाकरेंनी वेगवेगळ्या नेत्यांची नक्कल करत धमाल उडवून दिली. जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या आश्चर्याच्या भावांबद्दल त्यांची खिल्ली उडवली होती तर अजित पवारांची नक्कल करत ‘आपल्याला जमिनीतलं काय कळतं?’असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता.