www.24taas.com , नाशिक
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील सभेने त्यांच्या या दौऱ्याची सांगता होणार आहे.
मनसेला नाशिक महापालिकेच्या सत्तेत येऊन जवळजवळ वर्ष पूर्ण झालंय. शहरातील तीन आमदार निवडून आल्याने मनसेला नाशकात चांगला प्रतिसाद मिळालाय. त्रिंबक महापालिकाही त्यांच्या ताब्यात आल्याने राज ठाकरेंनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केलंय. खानदेशातील तिन्ही जिल्हे आता त्यांच्या निशाण्यावर आहेत. विशेषतः भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभा ठेवल्याने एकनाथ खडसेंवर राज पुन्हा निशाणा साधणार का? यावर चर्चा सुरु झालीय.
राज यांनी सत्ता मिळाल्यावर वेळोवेळी नाशिकच्या विकासाचं मॉडेल करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात त्यांनी नाशिकला फारसा वेळ दिलेला नाही. जानेवारीत एका कार्यक्रमासाठी नाशिकला आले असतानाही त्यांनी शहर विकासाबाबत मौन बाळगले होते. त्यामुळे राज यांच्या या नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या चर्चा आणि शहर विकासावर भर असणार आहे.
गेल्या काही काळात नाशिककरांनी चार आमदार तीन पलिका ताब्यात देऊन मनसे विकासाला पाठबळ दिलं आहे. आता राज्यात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले राज ठाकरे नाशिककरांच्या विकासाला सुरुवात करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.