www.24taas.com, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत मनसे-शिवसेना एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. मात्र आता ह्या गोष्टीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिसाद याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
अगदी वर्षभरापूर्वीच मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील जांबोरी मैदानातील भाषणात सांगितले होतं. `बाळासाहेब तुमच्या साठी मी एक पाऊल काय, पण शंभर पाऊलंही पुढे यायला तयार आहे. पण, फक्त तुमच्यासाठी.` मात्र वर्षभराच्या आतच बाळासाहेबांचे निधन झाले. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणाबाबत सकारात्मक भुमिका घेतल्याने राज ठाकरे आता एक पाऊल पुढे टाकणार का? हाच प्रश्न साऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
एकत्र येण्याचे राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार. याबाबत उत्सुकता लागली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेकडं साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांना तुम्ही आणि राज एकत्र येणार का असं प्रश्न विचारला असता त्यांनी फारच बोलकी प्रतिक्रिया दिली.
`प्रश्न महत्त्वाचा असा आहे की, एकत्र येण्याच्या पूर्वी दूर का गेलो? हा विचार होणं गरजेचे आहे. एकत्र येणार असू तर काय म्हणून एकत्र येतोय? मुख्य प्रश्न असा आहे की, आपण कोणाच्या विरुद्ध उभे आहोत? आपला राजकीय शत्रू कोण आहे? राजकारणातून आपल्याला कोणाला संपवायचं आहे? आणि त्याच्यासाठी कोणत्या दिशेनं जाण्याची गरज आहे?` असं उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलंय.
एकत्र येण्याबद्दल उत्तरच हवं असेल तर त्यासाठी तुम्ही ‘दोघांना’ म्हणजे आम्हाला एकत्र आणून समोरासमोर बसवा. बाजूबाजूला बसवा. आणि मग, तुम्ही एकत्र येणार काय? हा प्रश्न दोघांना ‘एकत्र’ विचारलात तर बरं होईल. या प्रश्नाचं उत्तर दोन बाजूवरती अवलंबून आहे. एका बाजूवरती नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी जणू काही संकेतच दिले आहेत.