पुणेकरांचा जीव धोक्यात!

पुण्यातल्या तब्बल २८ नाल्यांचे प्रवाह बलाण्यात आले आहेत. आणि त्यासाठी महापालिकेनंच परवानगी दिलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 13, 2013, 08:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पावसामुळे तुडुंब भरून वाहणारे नदी - नाले... रस्त्यांना आलेलं नद्यांच रूप. त्यात बुडालेली वाहनं, घरादारात शिरलेलं पाणी. वाहतुकीची कोंडी आणि गायब झालेली वीज. पावसामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यानं याचा भयानक अनुभव घेतला. आता शिंदेवाडीतल्या दुर्घटनेच्या रुपानं पुन्हा पुण्यात काय होऊ शकतं, याचा अंदाज आला. पण या सगळ्याला जबाबदार आहे ते पालिका प्रशासनच.
नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदल्यानं दोन वर्षांपूर्वी पुण्यात हाहाःकार उडाला होता. नाल्याचा प्रवाह बदलल्याचा फटका थेट तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांना बसला होता. पाण्याचा लोंढा थेट आयुक्तांच्या बंगल्यात शिरला होता... आता या सगळ्याला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याची माहिती पुढे आलीय. पुण्यातल्या तब्बल २८ नाल्यांचे प्रवाह बलाण्यात आले आहेत. आणि त्यासाठी महापालिकेनंच परवानगी दिलीय.
बिल्डर्सच्या सोयीनुसार बदलण्यात आलेले नाल्यांचे प्रमुख प्रवाह पाहूयात...
- खराडीमधले तीन नाले
- वडगाव शेरीमधला नाला
- धानोरीमधला नाला
- हडपसरमधला नाला
- घोरपडी, मुंढवा, आंबेगावमधले दोन नाले
- बावधनमधला नाला
या प्रमुख नाल्यांसह शहरातले अनेक छोटे-मोठे नाले महापालिकेच्या परवानगीनं वळवण्यात आले आहेत. बिल्डर्सची मजल एवढ्यावरच थांबली नाही. तर, अनेक ठिकाणी नाल्याचा प्रवाह वळवायला परवानगी मिळाल्यावर नालेच बंद करण्यात आले आहेत. इतकं होऊनही, काहीच गैर झाला नसल्याचा दावा महापालिकेचा आहे. मनसेच्या नगरसेवकांनी ही धक्कादायक माहिती उघडकीला आणलीय. यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.