www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या पहिल्या पावसात महापौरांचाच प्रभाग जलमय झाला. मग आज महापौरांनी आमदार आणि आयुक्तांसह दौरा करून पाणी का साचलं याचा शोध घेतला. पण हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. पावसाळ्याआधी हे दौरे का केले नाहीत, असा नाशिककरांचा सवाल आहे.
महापौर आपल्या दारी या अभियानानंतर महापौरांचा हा दौरा आपल्याच प्रभागात आहे. महापौरांनी आमदार वसंत गीते आणि मनपा आयुक्त यांच्याबरोबर ६ जूनच्या पावसाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी केली. मनपा प्रशासनानं पावसाळापूर्व कामं पूर्ण केली नाहीत. या दौ-यात महापौरांनी सराफ बाजार, फुल बाजार, भांडीबाजार आणि ज्या सरस्वती नाल्याच गळा घोटण्यात आलाय त्याची पाहणी केली. स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि परिसरातली अतिक्रमणं आणि फुल बाजार हटवण्याचे आदेश देऊन महापौर मोकळे झाले. मात्र ज्या नाल्यामुळे पाणी तुंबलं तो पाण्याचा मार्ग बुजवण्यात आलाय, त्यामुळे त्यावरचं उत्तर महापौरांकडे नव्हतं.
स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी या दौ-याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हा दौरा म्हणजे फक्त स्टंटबाजी असल्याचं स्थानिकांचं म्हणणंय. पहिल्याच पावसात शहर परिसर जलमय झाल्यानं त्यातून महापालिकेनं धडा घेणं अपेक्षित होतं. नैसर्गिक नाल्यांवरची अतिक्रमणं हटवायला हवी होती. ते राहिलं बाजूलाच... उलट नगरविकास विभागाच्या प्रधान साचिवांनीच शहर वाढत असल्यानं असे प्रकार घडणारच, असं नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळल्याचं विधान केलं. त्यामुळे मनपा अधिका-यांकडून तरी काय अपेक्षा करणार, असा सवाल नाशिककर करतायत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.