www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडल्यानं आता तीव्र संताप व्यक्त होतोय. गुडेवारांना पाठिंबा देण्यासाठी बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपनं आज `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.
भ्रष्टाचाराला चाप लावणाऱ्या आणि शहराला विकासाची दिशा देणाऱ्या गुडेवारांच्या मुद्यावर मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे मूग गिळून गप्प आहेत.
गुडेवार यांच्या आयुक्तपदाचे दहा महिने म्हणजे सोलापूर महापालिकेचा सुवर्ण काळच मानायला हवा. या काळात कामाला शिस्त आली. विकासकामांचा धडाका सुरु झाला. अतिक्रमणाविरोधी मोहिम तीव्र झाली. एवढेच नव्हे तर अतिक्रमण करणाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवण्यात आला.
चंद्रकांत गुडेवार यांनी १० महिन्यांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेचा पदभार घेतला आणि पालिकेतील सर्व विभागाला भेट देत कामात शिस्त आणली.
सोलापूर शहराला विकासाचा रस्ता दाखवणाऱ्या गुडेवार यांची कामं
गुडेवार यांनी सुरवातीला पालिकेची खडखडाट असलेली तिजोरी भरली आणि कामगारांचे पगार वेळेवर सुरु केले, LBT च्या माध्यमातून ३०० कोटींची विक्रमी वसुली केली, ३०० ते ४०० कोटीची अतिक्रमणे ताब्यात घेतली, त्याचबरोबर सोलापूर पालिकेची परिवहन सेवा उर्जावस्थेत आणली.
केंद्राकडून नवीन बसेससाठी २०० कोटीचा निधी आणला. सोलापूरातल्या रस्त्यावर ४ व्होल्वो बस धावू लागल्या, मर्जीतल्या ठेकेदारांचे ठेके रद्द करून नवीन ठेकेदारांना कामे देवून युध्दपातळीवर कामे करून घेतली.
पालिकेत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनाही एकसारखा निधी दिला. एकंदरित गुडेवार यांचा दहा महिने धडाकेबाज कामांनी गाजले.
अशी खणखणीत कामगिरी बजावणाऱ्या गुडेवारांना काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून पदभार सोडावा लागला. मात्र यामुळं नागरिकांच्या संतापाचा स्फोट झालाय. तर काँग्रेसेतर राजकीय पक्षांनीही एकत्र येवून सोलापूर बंदची हाक दिलीय.
गुडेकरांच्या राजीनाम्याची कारणं शोधली जातील आणि राजीनाम्याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय.
मात्र एवढं महाभारत होऊनही, सत्ताधारी काँग्रेस नेतृत्वाकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यानं, काँग्रेसचीच भूमिका आयुक्तविरोधी असल्याचं स्पष्ट होतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.