www.24taas.com, पुणे
पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं. राज्यस्तरीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. वनमंत्री आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
ताम्हिणीबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातल्या इसापुर पक्षी अभयारण्य़ालाही मान्याता देण्यात आलीय. ताम्हिणी घाट दुर्मिळ वनस्पती आणि जीवसृष्टीनं समृद्ध आहे. ताम्हीणी हे निमसदाहरीत वनांच्या प्रकारात मोडतं. या भागात सिरपिजीया हुबेरी, फेरीया इंडिका, सायटोक्लाइन लुटीया, सिरपीजीया मॅकॅनी अशा दुर्मिऴ वनस्पती आढळतात. शिवाय शेकरु, सांबर, पिसोरी आणि बिबट्यांचं इथे वास्तव्य आहे. गिधाडांची संख्याही जास्त आहे.
अशा जैववैविध्यानं समृद्ध असलेल्या ताम्हीणीमध्ये, वनसंपदा आणि वन्यजीवनाचा अभ्यास केला जातो. त्यामुळं या घाटाला विशेष संरक्षण मिळावं या उद्देशानं त्याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आलाय.