www.24taas.com, झी मीडिया, सांगली
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आता पाहूया एका बंडाची कहाणी... १८५७ च्या उठावानंतर इंग्रजी दडपशाहीची कोंडी यशस्वीपणे फोडण्याचा प्रयत्न झाला, तो सांगली जिल्ह्यातील बिळाशीच्या `बंडाच्या` रूपाने. लाठ्या - काठ्या आणि गोळ्या अंगावर झेलून सुद्धा इथल्या लोकांनी ब्रिटीश सत्तेला हादरवून सोडलं. स्वातंत्र्यलढ्यात इथले दोन युवक शहीद झाले. इतिहासात नोंद झालेलं हे गाव सध्या मात्र दुर्लक्षित आहे.
सांगली जिल्ह्यातील बिळाशी येथील १८ जुलै १९३० चा `जंगल सत्याग्रह` हा एक रोमांचकारी इतिहास आहे. यादिवशी बिळाशीच्या महादेव मंदिरासमोर तिरंगा फडकवण्यात आला. ही बातमी सर्वत्र पसरली. पाच सप्टेंबर १९३०ला सहाशे-सातशे बंदुकधारी पोलिस गावात आले. ही बातमी कळताच लोक देवळाजवळ जमले. ध्वजाभोवती लोकांनी सहा कडी केली. या सर्वांचे शिलेदार गणपतराव पाटील आणि गावतील पुरुष महिला यांनी ब्रिटिशाना विरोध केला. मांगरूळच्या धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार या दोन मुलांनी इंग्रजावर दगडफेक केली. त्यांच्यावर इंग्रजांनी निर्दयपणे गोळीबार केला. त्यात ते दोन्ही तरुण शहीद झाले.
गावात उभा केलेला केवळ एक स्तंभच इतिहासाची आठवण करून देत आहे. या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, ही मागणी गेल्या ६५ वर्षांत पूर्ण झालीच नाही. उलट गावातील अन्य जागेत तयार करण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची पार दुरवस्था झाली आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या स्मारकांना मोठी अवकळा आली असून कोणालाच याचे काही गांभीर्य नाही.
या ठिकाणच्या स्मारकाची सध्याची स्थिती अत्यंत विदारक आहे. मुख्य रस्त्याला लागून ही स्मारके असूनही शासन आणि पुढाऱ्यांची प्रचंड अनास्था ही या स्मारकांना अवकळा आणण्यास कारणीभूत ठरली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.