शरद पवारांच्या पुतण्यावर सरकारी विभागांची कृपा

बारामतीमधल्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्य़ावर सरकारी विभागांची मोठी कृपा झाली आहे. खाजगी कारखाना असूनही हा कारखाना नगरपालिकेच्या पाइपलाईनचा वापर करतोय. त्यासाठी भाडंही कमीच दिलं जातं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 1, 2013, 07:05 PM IST

www.24taas.com, बारामती
बारामतीमधल्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्य़ावर सरकारी विभागांची मोठी कृपा झाली आहे. खाजगी कारखाना असूनही हा कारखाना नगरपालिकेच्या पाइपलाईनचा वापर करतोय. त्यासाठी भाडंही कमीच दिलं जातं. या कारखान्यावर एवढी कृपा का याचा शोध आम्ही घेतला. हा कारखाना आहे शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा.
शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा बारामती अॅग्रो खाजगी साखर कारखाना आहे. हा कारखाना नगरपालिकेचीच पाईपलाईन वापरतो. बारामती अॅग्रो 2011 पासून या पाईपलाईनच्या मदतीनं उजनी जलाशयातून पाणी उचलतंय. या कारखान्यानं केलेले उद्योग पहिले की, बारामती नगरपालिका आणि इतर सारकारी विभागांना चुना लावण्याचा विडाच बारामती अॅग्रोनं उचललाय की काय, अशी शंका येते. पाण्यासाठी नगरपालिकेची पाईपलाईन हा साखर कारखाना वापरतो खरा, मात्र, त्यासाठी भाडे दिलं जातं ते फक्त 6 महिन्यांचंच... कारण इतर 6 महिने हा कारखाना बंद असतो, असा दावा करण्यात येतो. आणि नगरपालिकासुद्धा महिन्याचं फक्त अडीच लाख रुपये भाडं घेऊन गप्प बसते. आणि दुसरीकडे ही पाइपलाइन उभारण्यासाठीच्या कर्जाचा हप्ता म्हणून तब्बल 45 लाख रुपये बँकेत भरते. पवारांचा कारखाना म्हटल्यावर नगरपालिकेकडूनही हतबल प्रतिक्रियाच मिळतेय.
नगरपालिकेनंतर कारखान्यावर कृपा करण्याचा नंबर येतो तो एमएसईबीचा... बारामती अॅग्रोनं सुरुवातीचे अनेक महिने एमएसईबीला गंडवलं. पाणी खाजगी साखर कारखान्यासाठी वापरात असतानाही वीज बिल मात्र पिण्याच्या पाण्याच्या दरानं भरलं. एमएसईबीच्या खूप उशिरा हा प्रकार लक्षात आला.

जनावरांना चारा नाही, शेतासाठी पुरेसं पाणी नाही. अशा परिस्थितीत गावात पाणी मिळतं ते अशा साखर कारखान्याला.... त्यामुळे शेतकरीही संतप्त आहेत. बारामती अॅग्रोचे सर्वेसर्वा राजेन्द्र पवार यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. राजेन्द्र पवार यांचे काका शरद पवार नसते, तर नगरपालिका आणि इतर शासकीय विभागांनी एवढी तत्परता दाखवली असती का...हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.