माझी कातडी बधिर झाली आहे- शरद पवार

माझी कातडी आता बधिर झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2013, 10:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
कांद्याचे भाव वाढले की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. याला मीच जबाबदार, अशी टीका होते. मात्र कांद्याचे दर कोसळल्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. त्या वेळी त्यांच्या डोळ्यातील पाणी कोणाला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला चांगले पैसे मिळावेत, हे माझे धोरण आहे.
त्यासाठी कोणी काहीही बोला, टीका करा, माझी कातडी आता बधिर झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले. बारामती तालुक्यातील मेडद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, शेतमालाची किंमत हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कांद्याचे भाव वाढले की टीव्हीवर माझा फोटो येतो. शरद पवारच या भाववाढीला जबाबदार आहेत, अशी चर्चा होते. खतांच्या किमती, डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांहचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळाला नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. या देशातील १०० कोटींपेक्षा जास्त संख्येच्या लोकांसाठी दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून मालाला चांगली किंमत मिळालीच पाहिजे.
कांदा लावणारा शेतकरी कोण असतो, बारमाही बागायती शेतकरी कांदा लावतो का, जिरायती भागातच कांद्याचे पीक घेतले जाते आणि कांद्याला पैसे मिळतात किती? तरीही कांद्याची किंमत वाढली की पवारच याला जबाबदार आहेत, अशी चर्चा होते. ही चर्चा मी खूप वर्षे ऐकत आहे. माझी कातडी आता बधिर झाली आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.